अब्द

धडपड करणारे एक अनियतकालिक पत्र ('पत्रकारिता' या शब्दामधील 'पत्र' ही अक्षरं ज्या अर्थाची, त्या अर्थाने पत्र)

'दुसरा ब्लॉग' येथे पाहता येईल.

कॉपी नको

Protected by Copyscape plagiarism checker - duplicate content and unique article detection software.

ब्लॉग मैत्र

Thursday 19 November 2009

ज्ञान व साहित्य

- रेखा नार्वेकर

साहित्य सोनियाचिया खाणी। साहित्य विवेकवल्लीची लावणी।।" असे हे संत ज्ञानदेवांनी गौरविलेले साहित्य माणसाला जन्म आणि मृत्युमधला प्रवास (म्हणजेच जीवन) सुखी करण्यासाठी नेहमीच उपयोगी ठरले आहे. अन्न, वस्त्र, निवा-यासारख्या भौतिक प्राथमिक गरजांबरोबर अनाकलनीय अशा सृष्टीमध्ये सतत असणा-या चैतन्याचा, प्रेरणेचा स्त्रोत शोधून काढण्याची धडपड माणसाने करावी, हा या संतसाहित्यामागचा मुख्य हेतू असावा. या चैतन्याला देव, परब्रह्मा, भगवंत अशी अनेक नावे जरी दिली, तरी त्याचं संशोधन करताना करावा लागणारा अभ्यास आणि त्यातून मिळणारी प्रचिती, अनुभव म्हणजेच 'ज्ञान संपादन करण्याची क्रिया', असे संतांनी म्हटले आहे. "ज्ञानधन चैतन्य ब्रह्मसत्ता। ज्ञानदेवची तत्वता।।'', असे समर्थ रामदास म्हणतात आणि ''ब्रह्म म्हणजे निराकार। गगनासारिखा विचार।।'' असे ब्रह्माचे वर्णन करून ज्ञानाची अगाधता, विशालता, व्यापकता आभाळाचे उदाहरण देऊन समजावून सांगतात. ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात ''अर्जुना तया नांव ज्ञान। येर प्रपंचु हे विज्ञान।।'' असे स्पष्ट करून पंधराव्या अध्यायात उर्ध्वमुलवृक्ष- संसारवृक्ष लोकांना आकलन व्हावा, यासाठी ''हा संसारवृक्ष तैसा। मोडतु मांडतु सहसा। न देखोनी लोक पिसा अव्ययो मानी।।'' या ओवीची रचना ज्ञानदेव करतात. क्षणाक्षणाला होणा-या कोट्यवधी मृत्युंमुळे या संसारसागराचा लय, क्षय, व्यय जरी होत असला तरी त्याचवेळी कोट्यवधी नवे जीव जन्माला येऊन सृजन, वर्धन, नवनिर्माण क्रिया घडत असते.  हे स्पष्ट करताना जणू काही 'Energy can neither be destroyed nor be created, it can be changed from one form to another form, ultimately total energy in the universe is constant', हा conservationचा सिद्धांत ज्ञानदेवांना सुचवायचा आहे.

या विश्वात पसरलेल्या अश्वत्थ वृक्षाची मुळे( roots ) परब्रह्मात पोहोचतात आणि विस्तारलेल्या फांद्या, पाने माणसाच्या डोळ्यांना दिसतात. विश्वातील प्रत्येक दृश्य वस्तू- दगड, पर्वत, नद्या, सागर, चंद्र, सूर्य, तारे, वनस्पती, सूक्ष्म अमिबा यांपासून महाकाय डायनासोरासपर्यंत सर्वांचं संशोधन फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी,  इत्यादी शास्त्राच्या विविध शाखांमधून शास्त्रज्ञ करीत असतात. विज्ञानाच्या सीमा विस्तारित होऊन भौतिक सुखसोईंनी माणसाचं 'शरीर' सुखी करण्याचा प्रयत्न दिवसेंदिवस प्रगत होतो आहे. मग परब्रह्मातील डोळ्यांना न दिसणा-या मुळांचा अभ्यास करून मनाला अनुभूती देणारं ज्ञान संपादन करण्याची आकांक्षा माणसाने का धरू नये? हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून H2O म्हणजे पाण्याचा एक परमाणु बनतो हे प्रयोगशाळेत सिद्ध करता येते. पाणी डोळ्यांना दिसते, त्याचे मोजमाप करता येते. तसे विधायक कार्यातून मिळालेले समाधान 'लिटर', 'मीटर', 'ग्राम' मध्ये मोजता येत नाही. 'सम + धी' या संस्कृत धातूपासून बनलेला 'समाधान' हा शब्द. 'धी' म्हणजे 'बुद्धी'. बुद्धी स्थिर असताना- सम असताना, राग, लोभ, क्रोध, द्वेष, मत्सर सगळ्या विकारांचा कचरा दूर झाला असताना मनाला मिळालेला आनंद. समाधान, अनुभवलेला आनंद किती मिळाला, हे दाखवणं जसं कठीण आहे अगदी त्याच प्रकारे परब्रह्मातील मुळांविषयी सांगणे कठीण आहे. परंतु संत हे डोळ्यांना न दिसणा-या मुळांचा अभ्यास व संशोधन करणारे शास्त्रज्ञ आहेत. ज्ञानाविषयी योग्य समीकरणे मांडण्याची प्रगल्भता संतांकडे आहे.


निसर्गात घडणा-या घडामोडी, विश्वातील सजीव- निर्जीवांची उपस्थिती, वस्तुमात्रांना मिळणारी प्रेरणा, सृजन, नवनिर्माण, लय, क्षय, व्यय, विघटन, जन्म, मरण या सर्वांमागची शृंखला, कार्यकारणभाव समजून घेण्यासाठीचे संशोधन म्हणजेच त्या चैतन्याचे, देवाचे, परब्रह्माचे भजन, पूजन होय. या पूजनासाठी लागणारे 'साहित्य' उपलब्ध करून घेण्यासाठी दया, क्षमा, शांती, करुणा, प्रेम आत्मसात करावे लागते, लोभ-क्रोधादी विकार दूर फेकावे लागतात. आणि मग त्या चैतन्याला शोधताना वाटेत मिळालेल्या खाणाखुणांचा घेतलेला मागोवा अक्षर, शब्द, भाषेच्या सुंदर गुंफणीतून साहित्यात प्रकट करण्याचे सामर्थ्य, प्रतिभा प्राप्त होते.

साहित्यामुळे सहत्व निर्माण व्हावे. सहत्वातून एकत्व यावे. एकत्वातून ममत्व यावे- जिव्हाळा वाढवा. आणि या सर्वांतून 'देवत्वा'कडचा मार्ग सापडावा. साहित्याच्या माध्यमातून मनुष्य देवत्वापर्यंत पोहचू शकतो, हे ज्ञानदेवांनी नैतिकता, व्यापकता, सूक्ष्मता, करुणा, कोवळेपणा अशा अनेक गुणांनी युक्त असलेली 'ज्ञानेश्वरी' लिहून सातशे वर्षांपूर्वी सिद्ध केले. अर्थात समाज समृद्ध करणारे, चर-अचर समतोल साधणारे, माणसा-माणसांत संवाद घडवणारे, विश्वाचे कल्याण इच्छिणारे 'विश्वची माझे घर' मानून बंधुत्वाचा, समतेचा, स्नेहाचा, विवेकाचा संदेश देणारे 'ज्ञान' ज्या साहित्यात सांगितले असेल तेच उत्तम 'साहित्य' हे सर्वांना निर्विवादपणे मान्य करावे लागेल.

- रेखा नार्वेकर, न्यूयॉर्क.
ई-मेलसाठी पत्ता-  narweker@gmail.com
अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई.
विश्वस्त, महिला विकास मंडळ, कुलाबा, मुंबई.
प्रमुख, महाराष्ट्र महिला व्यासपीठ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.

('निसर्गाचे गूढ आणि आत्ममग्न सिव्हिलायझेशन'- हे 'लोकसत्ता'मध्ये प्रसिद्ध झालेले पत्र ही रेखाताईंशी झालेली पहिली ओळख. त्यानंतर केवळ ई-मेलने केलेल्या विनंतीवरून त्यांनी खास 'अब्द'च्या वाचकांसाठी हा लेख लिहून पाठवला आहे. रेखाताईंचे अनेक आभार.)

Sunday 15 November 2009

सचिन नावाची वृत्ती


ह्या पत्राचे जे विषय ठरवले आहेत, त्यात 'सचिन तेंडुलकर' हा विषय नाही. पण सचिन तेंडुलकर ही गोष्टच अशी आहे की, विषयांतराचा मोह आवरू नये. आणि तसंही त्याचे वडील साहित्यिक होते. ('मानस-लहरी', 'सहवासातील साहित्यिक', 'बालकवींची कविता: तीन संदर्भ', 'प्राजक्त' ही चार पुस्तके रमेश तेंडुलकर यांनी लिहिली. अजून लिहिली असतील तर माहीत नाही.) वांद्र्याच्या 'साहित्य सहवास'मध्ये त्याचं बालपण गेलं. म्हणजे साहित्याचा काहीतरी संबंध येतोय. त्यामुळे तसे आपण थोडे विषयाला धरूनच बोलतोय असं समजू.
तर मुद्दा हा की, सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, त्या घटनेला आज वीस वर्षं पूर्ण झाली. त्याबद्दल त्याला शुभेच्छा.
***
सचिन तेंडुलकर म्हणजे सचिन तेंडुलकर आहे. तो या जगातल्या खिलाडुवृत्तीचं प्रतीक आहे. आता तो खेळाडू म्हणून किती महान आहे, ते अनेक तज्ज्ञ लोक सांगतील, तेवढा काही आपला अधिकार नाही. पण सचिन तुम्हाला खुलवतो. तो जेव्हा खेळत असतो तेव्हा तो साधना करणा-या साधूसारखा भासतो. तो इकडे तुमच्या-आमच्यात नसतोच. तो तिकडे उंच, वर शिखरावर बसलेला असतो, साधना करत. कोणतेही क्षुद्र निकष तेव्हा त्याला लागू होत नाहीत. सचिन ही एक वृत्ती आहे, खरं काम करण्याची, प्रामाणिक काम करण्याची, कामात आनंद घेण्याची आणि कामाने आनंद वाटण्याची. (हे आता तसं अगदीच भाबडं आणि बालिश वाटेल, पण ते तसं आहे खरं.)
***
परवा एका मुलाखतीत सचिन म्हणाला, "भारतातील लोक कायमच माझ्याबरोबर असतात. जेव्हा तुम्ही काहीतरी करून दाखवता, जेव्हा तुम्ही एका विशिष्ट स्थानी पोचता, तेव्हा कोणीतरी तुमच्या आनंदात सहभागी व्हावं, असं तुम्हाला वाटतं. माझ्या आनंदात करोडो लोक सहभागी होतात." या करोडो लोकांमधल्या एकाकडून सचिनला अनेक शुभेच्छा.
***
(सचिन तेंडुलकरचे छायाचित्र इंटरनेटवरून घेतले आहे. )

Monday 9 November 2009

भाषा गेली माणसाच्या गांडीत

कसली भाषा कसले साहित्य
भाषा गेली माणसाच्या गांडीत
अरे माणसाच्या नाही म्हशीच्या म्हणतात
पण म्हशीला कशाला त्रास माणूसच बरा आहे

एक पाकिस्तानात संबंध असलेला अतिरेकी
एक मुंबईतल्या मुंबईत संबंध तयार झालेला अतिरेकी
दोघे भोसडीचे हसतायत
आणि बाकीचेही हसतायत

कानाखाली आवाज भाषेचा आवाज
राजकारणावरच्या चर्चांचा अडाणचोट आवाज
लाचार लाळघोट्या बिनडोक पत्रकारांच्या झुंडी

ह्याच्यावर चर्चा त्याच्यावर चर्चा षंढ मोर्चा
निर्माण नवनिर्माण राष्ट्रवाद समाजवाद
सगळ्या चळवळींची बुळबुळीत वळवळ

'अहो एवढं चिडायचं कारण काय?'
'चिडून काय होतं?'
'शांतपणे विचार केला पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे'

विचार, विश्लेषण म्हणजे रे काय भाऊ?
विचार आणि विश्लेषण म्हणजे
नरड्यात येईल ते थोबाडातून बाहेर ओकत राहाणे

समाजातल्या 'स'नंतर साहित्यातला 'सा'
कुठला समाज कुठलं साहित्य कसली भाषा

बथ्थड डोकी पैशांची खोकी
माणसं सगळी ओकीबोकी

'अहो असं चिडून कसं चालेल?'
'एवढं हळवं होऊन कसं चालेल?'
'आता परिस्थिती अशी आहे म्हटल्यावर स्विकारलं पाहिजे'
'त्यातंच आपण ह्यांव केलं पाहिजे त्यांव केलं पाहिजे'

मराठी माणूस?
अहो माणूस आहे कुठे?

(महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत आज घडलेल्या घटनेत सहभागी सर्वांचा निषेध. निषेध. निषेध.)

Sunday 8 November 2009

सुनीताबाई गेल्या

सुनीताबाई गेल्या.
म्हणजे अजून एक प्रामाणिक विचार गेला. एक रॅशनल विचार गेला. शब्दांना महत्त्व देणारी अजून एक व्यक्ती गेली.
माणूसपणा गेला.
८३-८४ वर्षं, म्हणजे तसं पुरेसं जगल्या, असंच म्हणायला पाहिजे. 'आहे मनोहर तरी गमते उदास' म्हणत होत्या. काय, 'दु:ख झालं', 'वाईट वाटलं', म्हणत बसायचं. गेल्या एवढं खरं.
आत्ता ह्या क्षणी त्यांचं एकही पुस्तक जवळ नाहीये. त्या पुस्तकांमधले शब्द वाचता येत नाहीयेत.
तसं काय त्यांना आपण प्रत्यक्ष भेटलेलो नाही, की असा काही प्रयत्न केला नाही, पण तरी त्या कुठेतरी होत्या, भांडारकर रोडला का कुठेतरी त्यांच्या घरी. म्हणजे त्या पुस्तकं, पेपर वाचत होत्या असतील. टीव्ही बघत होत्या असतील. काहीतरी आजूबाजूच्या गोष्टींबद्दल बोलत होत्या असतील. हसत होत्या असतील. पण आता तसं काही नसणार. त्यांना कधीही प्रत्यक्ष बघता येणार नाही.
काल सुनीताबाई गेल्या आणि आज पुलंचा जन्मदिवस. आता ह्याच्यात कोणीतरी प्रतिकात्मक वगैरे अर्थ काढत राहातील. पुल गेले तेव्हा सालं काही वाटलंच नव्हतं, कारण काही माहितंच नव्हतं. आता सुनीताबाई गेल्या. त्यांच्याबरोबर त्यांचं अफाट वाचन गेलं. त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत म्हणा, त्यांची आठवण करून द्यायला.
एवढीच सुनीताबाईंशी आमची ओळख. आणि काय लिहिणार? आमच्या गाववाल्या होत्या, म्हणून तीसुद्धा मनातल्यामनात समाधान देणारी एक साहजिक जवळीक होती आमच्याबाजूने. अश्रू वगैरे ढाळूनही काही
उपयोग नाही ओ.
***
(मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी 'सुनीता देशपांडे यांचे निधन', 'सुनीताबाईंना मान्यवरांची श्रद्धांजली' याखाली जो मजकूर छापलाय, त्या मजकुराच्या भि**** ड्राफ्टिंगबद्दल उगीच चर्चा नको.)


सुनीता देशपांडे
***
(छायाचित्र इंटरनेटवरून घेतले आहे.)

Thursday 5 November 2009

काही शब्द- ३

वरिष्ठ व प्रामाणिक शब्द
आज आमच्या वरिष्ठांकडून काही प्रामाणिक, खरे आणि महत्त्वाचे शब्द ऐकायला मिळाले आणि त्या अनुषंगाने इथे काही शब्द लिहायलाच हवेत असं वाटलं; कारण विषय ह्या पत्राशी संबंधित आहे. लिटील मॅगझिन, अनियतकालिकांची चळवळ यावरून ते बोलत होते. मार्केट फोर्सेसमुळे काय झालं? पूर्वी काय होतं?
"ती एक चळवळ होती, मला आतून काही सांगवंसं वाटतं, ते सांगण्याची. ते आर्थिक फायद्यासाठी नव्हतं. . . लिहून, स्वत:च्या खर्चाने त्याच्या कॉपीज काढून मी वाटल्या तर आता काय होईल? . . . आता मी काही का सांगू, जर कोणी ऐकणारच नसेल तर?" - इति वरिष्ठ.
"तुझी अश्लील किंवा अगदी बीभत्स कविता आता कोणी छापेल का? खपणार असेल तर छापेल. पण खपणार नसेल तर?" - इति वरिष्ठ.
'''अमुक तमुक' आहे, असं मला वाटलं तरी मी 'अमुक तमुक' आहे, असं म्हणू शकतो का? (ह्या 'अमुक तमुक'च्या जागी ते वेगळे शब्द बोलले बरं का.)
हे शब्द म्हणजे केवळ 'पूर्वी असं होतं, आता काहीच राहिलं नाही' या प्रकारात मोडून नंतर सोडून द्यावेत असे नाहीत. जरा थांबून त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं, असं वाटतं.
***
ह्या बाजारातले विक्रेते आणि गि-हाईक कोण? मागणी व पुरवठा कोण ठरवतं? ताळेबंद कोण मांडतं?
व्यक्त होण्याच्या धारणा बदलल्या का?
माहितीचा स्फोट झाला म्हणतात, त्यात ज्ञान मेलं की काय?
***
खरंतर हे इथे लिहिणार नव्हतो कारण यावर लिहून, त्यावर चर्चा करून काही उपयोग आहे की नाही यविषयी शंका आहे. पण त्यांचे शब्द प्रामाणिक होते आणि मुख्य प्रवाहरुपी गटाराच्या शेजारी जी फुलं आणि पक्षी आहेत त्यांच्याकडे बघून हे पत्र चालू असल्यामुळे प्रामाणिक शब्द सापडले तर त्यांना इथे जागा द्यायलाच हवी.
***

Wednesday 4 November 2009

नोंद- ४


निसर्गाचा अनुभव घेतल्यानंतर, निसर्गातला निर्मळपणा, प्रामाणिकपणा, वैश्विकता या सगळ्यांना जोडणारे आणि या सगळ्यांनी भरलेले शब्द 'भावमुद्रा'मध्ये आहेत. यातला निसर्ग गल्लीतल्या कचराकुंडीपासून सह्याद्रीपर्यंत पसरला आहे. या निसर्गात पुस्तकं आहेत, पुस्तकांमधलं ज्ञान आहे, गुलमोहोराचं झाड आहे, माणसं आहेत. माणसाच्या आतमध्ये असलेला निसर्ग, माणसाला चिकटून असलेला निसर्ग आणि माणसाला कधीच न पकडता येणारा निसर्ग. दुर्गाबाईंचं निसर्गावर जेवढं प्रेम तेवढंच प्रेम शब्दांवर. त्यामुळे शब्दसुद्धा आदर ठेवून आपुलकीने, काळजीपूर्वक वापरलेले. भावनांच्या मुद्रा उमटवलेले शब्द. सुंदर शब्द.
***
भावमुद्रा
मौज प्रकाशन
किंमत: १०० रुपये.
***










दुर्गा भागवत
***

Friday 30 October 2009

माझी भाषा

- भूषण राजगुरू

('भाषेचा विकास', 'भाषेचा प्रवास' अशा विषयांवर चर्चा, भाषणं, लेख असं काय काय झडत, पडत असतं. भाषेच्या प्रवासाचे जे अनेक भाग असतील त्यातील एक भाग असलेल्या एकाला थोडंसं लिहायला सांगितलं. त्याने लिहून दिलं, ते येथे प्रसिद्ध करत आहे. खालचे सगळे शब्द काळजीपूर्वक वाचले तर त्या प्रवासाचे अनेक कंगोरे कळू शकतील, असं वाटतं. - अब्द)

मी मूळचा सोलापूरचा. ग्रामीण भागातून आल्यानं भाषेचा न्यूनगंड होताच. काही जर कुठं बोलायचं असेल तर सुरुवातीपासून पुणेरी स्टाईलने बोलायचं असं ठरलं होतं. पण चुकून थोडीतरी का होईना सोलापुरी भाषा बोलण्यात येतंच होती. 'सोलापुरी भाषा' पुण्यातील लोकांसाठी गावंढळ समजली जाते, त्यामुळे मी जरा जपून आणि थोडक्यात बोलत असे. मी कितीही सुधारणा करून बोललं तर पुढच्यांना ते लगेच लक्षात येत असे, आणि ते लगेच म्हणायचे, ''तुम्ही सोलापूरचे का?'' त्यामुळे या पुणेरी भाषेमुळे मला अधिकच न्यूनगंड निर्माण झाला. त्यामुळे सगळ्यांशी बोलताना विचार करून बोलायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर, या नाटकी बोलण्याचा मला तरी कंटाळा येतो. त्यामुळे मी माझ्या जवळच्या मित्रांशी बोलताना मात्र माझ्याच भाषेत बोलायचो/बोलतो. ते मला जास्त आवडतं. त्यामुळे मनमोकळ्या गप्पा होत असत. मात्र, तो परिस्थितीचा एक भाग झाला. पण जी सत्य परिस्थिती आहे, ती स्विकारणं जास्त योग्य ठरेल. त्यापासून पळवाटा काढण्यात काही तथ्य नाही. म्हणून मी परिस्थिती स्वीकारून चांगल्याप्रकारे इतर मुले-मुली कशी बोलतात ते पाहून बोलण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांत मला मित्रांकडून चांगल्या प्रतिक्रियासुद्धा मिळू लागल्या. त्यामुळे सकारात्मक विचार करण्यास सुरुवात केली.
मी जेव्हा २००७मध्ये पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात प्रवेश घेतला, त्यावेळी सगळ्यांशी जपून वागत असे, कारण 'बोलण्यात काहीतरी चूक होईल का?' ही भीती मनात होती. पण हळूहळू ती भीती निघून गेली, कारण आपल्यासारखेच सगळेजण आहेत, त्याच भाषेत बोलतात, फक्त कमी-जास्त प्रमाणात त्यांची भाषा चांगली किंवा वाईट असते, हे लक्षात आलं. एखादी गोष्ट येत असूनही वर्गात न बोलण्याची सवय मात्र अद्यापही गेलेली नाही. कारण बोलण्यात काही चुकेल का? असा प्रश्न पडतो. यामुळे माझंच नुकसान आहे, हेसुद्धा लक्षात येतं, त्यामुळे पुण्यात आल्यानंतर प्रथम मराठी भाषा सुधारण्याचा प्रयत्न केला आणि तो थोड्याफार प्रमाणात यशस्वीही झाला. म्हणून आता पुढचं पाऊल असेल ते, इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.


- भूषण राजगुरू (ई- मेलसाठी पत्ता: rajguru.bhushan20@gmail.com)

(थोडेफार संस्करण अमुक तमुक यांनी केले.)

(पाव्हण्यांचं लिखाण प्रसिद्ध करायचं ठरवलं, त्याची सुरुवात रेवाताईंच्या कवितेने झाली. आता हे अजून एक. म्हणजे ऑक्टोबर महिन्यातले दुसरे पाहुणे.- अब्द)

Blog Archive

मराठी ब्लॉग विश्व

About Me

My Photo
Avadhoot Dongare
Ratnagiri / Pune, Maharashtra, India
About me? About me. . .
View my complete profile